कॉलेजविश्वात आणि त्याचबरोबर ओघाने येणाऱ्या प्रेमविश्वात नुकतंच पदार्पण झालेल्या, मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या, 'बॉईज २' मधील 'शोना' हे रोमँटिक साँग नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. लेह लडाखमध्ये चित्रित करण्यात आलेले हे गाणे, प्रेमाच्या गुलाबी थंडीची अनुभूती देऊन जाते. सुप्रसिद्ध प्रेमगीतकार मंदार चोळकर लिखित या गाण्याला, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा आवाज लाभला आहे. निसर्गाच्या कुशीत आणि बोचऱ्या थंडीत प्रेमाची हळूवार पालवी फुलवणारं हे गाणं सुमंत शिंदे आणि सायली पाटील या फ्रेश जोडीवर चित्रित करण्यात आले आहे. प्रेमीजोडप्यांना आकर्षित करणाऱ्या या गाण्यातील विहंगम दृश्य रसिकांचे मन मोहून टाकतात.

सनई-चौघडे, वरात घाई, नाचगाणी या साऱ्यांचा जल्लोषमय मिलाफ म्हणजे लग्नसमारंभ. अशा उत्साहाप्रमाणे पार पडणाऱ्या लग्नावर आधारित सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांचा 'शुभ लग्न सावधान' हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमातील 'ओ साथी रे' हे भावनिक गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईट्सवर लाँच करण्यात आले आहे. उत्कृष्ट संगीत, गाण्याचे शब्द आणि त्याला मिळालेली सुबोध - श्रुती यांच्या भुरळ घालणाऱ्या अभिनयाची साथ यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मोठ्या पसंतीस पडत आहे.

'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते. 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला' या सनीच्या रिमिक्स लावणीने गतवर्षीच्या बॉईजला चांगलीच प्रसिद्धी मिळून दिली होती. त्यामुळे येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या 'बॉईज २' मध्ये आयटम सॉंग नसेल तर नवलच ! अवधूत गुप्तेचे भन्नाट संगीतदिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमातील 'तोडफोड' हे आयटम सॉंग तरुणांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे.

मराठी, हिंदी चित्रपटामध्ये आपण अनेकदा आयटम सॉंग बघितले आहे, त्यात अनेक नृत्यांगना, सुंदर अभिनेत्री डान्स करताना दिसतात क्वचित प्रसंगी अभिनेत्यांनी आयटम नंबर केल्याचे बॉलीवूड मध्ये उदाहरणे आहेत. मात्र तुम्ही कधी ‘भाईटम सॉंग’ बघितले आहे का? प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे भाईटम सॉंग आहे, नुकतेच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर पसंती देत व्हायरल केले आहे.

'अटकमटक' चा डाव प्रत्येकांनी आपल्या लहानपणी खेळला असेल. धम्माल मस्ती आणि पोटभर हसू आणणाऱ्या या बैठी खेळाचे बोल, आता नव्या रुपात आपल्यासमोर येणार आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत 'माझा अगडबम' या चित्रपटातील 'अटकमटक' हे गाणे प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणारे आहे. सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेले हे विनोदी गाणे, 'माझा अगडबम' सिनेमातील 'नाजूका' या प्रमुख पात्रावर आधारित आहे.

मातीच्या गोळ्यापासून टप्प्याटप्प्यानं त्याला येणारा आकार... रंगरंगोटीतून साकारणारं श्री गणेशाचं रूप... साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा आणि आरती... हा श्री गणेशाचा प्रवास मोरया गणाधीशा या गाण्यातून प्रेक्षकांपुढे आला आहे. उडान टप्पू या आगामी चित्रपटातलं हे गाणं गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आलं.

Advertisement